रयत संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना संधी…शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय
सातारा : संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी रयत शिक्षण संस्थेची बैठक झाली.संस्थेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निवडींवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रयतबाबत जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो संस्थेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला. एखाद्या प्राचार्याऐवजी माजी सनदी अधिकाऱ्याची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची, तर संघटकपदी माजी चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना पदाधिकारीपदी संधी मिळाली आहे.रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी आजपर्यंत संस्थेतील ज्येष्ठ व अनुभवी प्राचार्यांची निवड करण्याचा प्रघात होता. मात्र, यावेळी प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना या पदावर नेमण्यात आले आहे. ९ मे २०२३ रोजी कर्मवीर पुण्यतिथी दिनी झालेल्या बैठकीत संस्थेच्या कार्याध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची निवड शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना संस्थेचे पदाधिकारी होण्याची संधी मिळाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या संघटकपदी डॉ. अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे. डॉ. पाटील हे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू आहेत. त्यांनी संस्थेत कार्याध्यक्षपद भूषविले आहे. संस्थेच्या एकूण गुणवत्तावाढीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वसाधारण सभेस संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी,आमदार विश्वजीत कदम, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे पदाधिकारी ज्ञानदेव मस्के, बंडू पवार, शिवलिंग मेणकुदळे तसेच मॅनेजिंग कौन्सिलचे अन्य सदस्य उपस्थित होते.