महाराष्ट्र:राजीनाम्याचा अंतिम निर्णय शरद पवार यांच्याशी बोलूनच -डॉ. अमोल कोल्हे
उपमुख्यंत्रीपदाची अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली.शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र आपल्याला या शपथविधीची कोणतीही कल्पना आपल्याला नव्हती. राजकारणात नैतिकता विश्वासार्हता राहीलेली नाही. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या घडामोडी पाहून मन व्यथित होतं असे सांगून माझ्या राजीनाम्याबद्दल शरद पवार यांच्याशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले.
रविवारी अजित पवार आणि अन्य आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित असल्यामुळे अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या गटात गेल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर खासदार कोल्हे यांनी सोमवारी एक ट्विट करत ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी खासदारकीच्या राजीनाम्याबद्दल वक्तव्य केले आहे.
“मी वेगळ्या कामासाठी अजित पवार यांच्याकडे गेलो होतो. तिथे गेल्यावर आपल्याला भाजपा बरोबर जावं लागू शकतं असं कानावर घालण्यात आलं होतं. मात्र, लगेच शपथविधी आहे हे माहिती नव्हतं. शपथविधी कार्यक्रमाला राजभवनात गेले तेव्हाच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितलं होतं.
मतदारांचा विश्वासघात करण्यापेक्षा खासदारकीचा राजीनामा देऊन सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून रहावे अशी मनस्थिती झाली आहे. शरद पवार यांच्यासोबत बोलून राजीनाम्या बाबत अंतिम निर्णय घेईल, असे ते म्हणाले.