पुण्यात अडीच वर्षांत महिलांवरील गुन्हे वाढले, एकतर्फी प्रेमातून पाच जणींची हत्या तर काहीना धमकी, हल्ला
गेल्या अडीच वर्षांत पाच तरुणींची हत्या करण्यात आली आहे, तर एका तरुणीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तरुणींना धमकावण्यासह कोयता, चाकू आणि अन्य धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या १३ घटना आहेत. त्यात एकतर्फी प्रेमातून विवाहितेला १४ दिवस घरात डांबून ठेवल्याची घटना खराडी येथे फेब्रुवारी २०२१मध्ये घडली होती. एप्रिल २०२१मध्ये तरुणी आणि तिच्या मित्राला कोथरूड परिसरात भर रस्त्यात मारहाण केल्याच्या घटनांचा समावेश आहे. बहुतांशी घटना उपनगरात घडल्या आहेत. शहरात कोयता सहज उपलब्ध होत असल्याने गुन्ह्यांमध्ये सर्रासपणे वापर केला जात आहे. चित्रपटांमधील मारहाणीच्या दृश्यातही, विशेषत: दाक्षिणात्य चित्रपटात कोयत्याचा वापर केला जातो. त्यामुळे तरुणाईवर त्याचा प्रभाव असल्याचे दिसून येते.
भर वर्गात विद्यार्थिनीवर चाकूने वार… क्रीडा सराव करणाऱ्या मुलीची हत्या… दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा खून… या घटनांनी गेल्या अडीच वर्षांत पुणे शहर हादरले आहे. एकतर्फी प्रेम किंवा प्रेमास नकार दिल्याने तरुणींना जीवे मारण्याची धमकी देणे, त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणे आणि हत्या करणे, अशा घटनांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एकतर्फी प्रेमातून झालेले खून
– तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या. (March 21)
– १४ वर्षीय क्रीडापटू मुलीचा ४७ वार करून खून. बिबवेवाडी येथील घटना. (Oct 21)
– श्वेता रानवडे या तरुणीचा औंध येथे खून. आरोपीने नंतर आत्महत्या केली. (Nov 22)
– तरुणीच्या पतीचा खून. येरवडा येथील घटना. (Aug 22)
– खडकी येथे महिलेचा भर रस्त्यात खून. (April 23)
– लग्नास नकार दिल्याने दर्शना पवार हिचा राजगड येथे खून. (June 23)
एकतर्फी प्रेमातून झालेले हल्ले
– एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांवर कोयत्याने वार.(April 21)
– चंदननगर परिसरात तरुणीवर चाकूने वार. (Feb 22)
– चंदननगर येथे शाळा सुरू असताना भरलेल्या वर्गात दहावीच्या मुलीवर चाकूने सपासप वार. (March 22)
– चाकूच्या धाकाने तरुणीचे अपहरण करून तिला मारहाण करून, चावा घेतल्याची येरवडा येथील घटना. (April 22)
– प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीवर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याच्या दोन घटना (April 22)
– प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीवर गुंडांकडून हल्ला, कोयत्याने वार. (Dec 22)
– लोहगाव येथे तरुणीची दुचाकी पेटवली. (April 23)
– सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार ( June 23)