काळेवाडी:माथाडी संघटनेच्या अध्यक्षाला अटक, खंडणीची मागणी करत ट्रक चालकांना मारहाण
ज्योतिबा नगर, काळेवाडी, पिंपरी चिंचवड येथे भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. ट्रक चालकांना मारहाण करत जबरी चोरी करून, माझ्या एरिया मधून माल न्यायचा असेल तर प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने तीन ट्रक चालकांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने फिर्यादीस मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन जात असताना आरोपी त्याच्या सफारी कार (MH 12/JC 7392) मधून आला. त्याने त्याची कार फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या दोन ट्रकला आडवी घातली.
आरोपी म्हणाला, मी सुरेश बनसोडे आहे. भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेचा अध्यक्ष आहे. तुम्ही माझ्या एरिया मधून मला पैसे न देता माल कसा घेऊन जाणार, असे म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे विनंती केली की, माझ्याकडे फक्त एक हजार रुपये आहेत. ते देखील आम्हाला प्रवासामध्ये लागतील, त्यावरून आरोपीने जबरदस्तीने ते पैसे घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.