पिंपरी चिंचवड:खासगी प्रवासी बसेसवर पिंपरी चिंचवड आरटीओ कडून कारवाई…मोहिमे अंतर्गत मोठी दंड वसुली
नियमभंग करणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक बसेसवर पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. यात आरटीओच्या दोन वायुवेग पथकांनी 45 दिवसात 363 प्रवासी बसेसची तपासणी केली. यामध्ये एकूण 146 वाहने दोषी आढळली.त्यामुळे या बसेसवर कारवाई केली आहे.
राज्यभरातील खासगी कंत्राटी प्रवासी बसेस तपासणीची विशेष मोहीम परिवहन विभागाकडून हाती घेण्यात आली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड आरटीओ कडून 16 मे ते 30 जून या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली.
दोषी आढळलेल्या बसेसवर मोटार वाहन कायद्यातील विविध कलमान्वये प्रतिवेदने जारी करण्यात आली. ज्यामध्ये विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक करणे, विधिग्राह्य योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, जादा भाडे आकारणी करणे, अवैधरित्या टप्पा वाहतूक करणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, वाईपर आदींची तपासणी, कर न भरणे, अग्निशमन यंत्रणा व आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे यांची तपासणी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड आरटीओने केलेल्या या विशेष मोहिमे अंतर्गत एकूण 12 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नियमबाह्य वाहतूक केल्यास अपघातांची शक्यता निर्माण होते. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे