पुणे मेट्रोचे संचालक कार्यालय आणि कॉर्पोरेट कार्यालय यांचे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाच्या परिसरात स्थलांतर
नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रो प्रकल्पाचे घोले रस्ता येथील संचालक कार्यालय आणि कोरेगाव पार्क येथील कॉर्पोरेट कार्यालय सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या परिसरातील A 3 ब्लॉकमध्ये संचालक कार्यालय, प्रशासन विभाग, वित्त विभाग, मानव संसाधन विभाग तर ‘A 2’ ब्लॉकमध्ये खरेदी व निविदा विभाग, भूमी विभाग, भूमिगत मेट्रो बांधणी विभाग स्थलांतरित झाले आहेत.
पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रोचे सिव्हिल कोर्ट हे इंटरचेंज स्थानक आहे. सिव्हिल कोर्ट परिसरात पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मेट्रो भवनची उभारणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर सिव्हिल कोर्ट हे स्थानक शिवाजीनगर ते हिंजेवाडी या मेट्रो लाईनच्या स्थानकातून प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे. या सर्व दृष्टिकोनातून नागरिक आणि कर्मचारी यांच्या सोयीसाठी मेट्रोचे कार्यालय स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.