मावळात मोठा राजकीय खूनाचा कट-किशोर आवारे खूनाचा बदला
तळेगाव दाभाडे (ता. मावळ)येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांचा यावर्षी १२ मे रोजी भरदिवसा नगरपरिषदेमधे खून करण्यात आला होता.या खूनाचा बदला मोठा राजकीय खून करून करण्याचा कट रचून मावळात पुन्हा धमाका करण्याचा एका गुंड टोळीचा कट पोलिसांनी उधळला आहे.त्यात पाच सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून सात पिस्तूले आणि २१ काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. दहा दिवसांपूर्वीच या टोळीचा प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा. हरणेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे) त्याचा साथीदार शरद मुरलीधर साळवी (वय 30, रा. धनगरबाबा मंदिरामागे काळेवाडी, पिंपरी) पिंपरी-चिंचवड शहर गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या.
त्यावेळी त्यांच्याकडे मध्यप्रदेशातून आणलेली चार पिस्तूले आणि १४ काडतूसे सापडली होती. हे दोघे आपल्या इतर पाच साथीदारांनी आवारेंच्या खूनाचा बदला घेण्याचा कट रचला होता. पण, तो हे दोघे पकडले गेल्याने उघड झाला. पुढील तपासात त्यांचे बाकीचे पाच साथीदारांनाही दरोडा विरोधी पथकानेच आता पकडल्याने हा कट उधळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अमित जयप्रकाश परदेशी (वय 31, रा. तळेगाव दाभाडे), मंगेश भीमराव मोरे (वय 30, रा. वडगाव मावळ), अनिल वसंत पवार (वय 39, रा. तळेगाव दाभाडे), अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी (वय 28, रा. तळेगाव दाभाडे), देवराज (रा. जळगाव जामोद, बुलडाणा) अशी आता पकडलेल्या सांडभोर टोळीतील गुंडांची नावे आहेत.
ते व अगोदर पकडलेला सांडभोर आणि साळवी विरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, नगर येथे खून, खूनाचा प्रयत्न, जाळपोळ, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लुट, वाहनांची तोडफोड आणि दंगल असे २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची नोंद घेऊन या टोळीला आता पोलिसांनी ‘मोका’ ही लावला आहे. विनयकुमार चौबे हे पोलीस आयुक्त आल्यापासून गेल्या सहा महिन्यांत 11 गुन्हेगारी टोळ्यांतील 139 गुंडांना तो लावण्यात आला आहे.