महाराष्ट्र हे महान राज्य तसेच संत व समाज सुधारकांची भूमी- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे समाज सुधारक तसेच समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारख्या संतांची शिकवण असणारे महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे. असे सांगून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रात प्रथमच आल्या होत्या. त्यांचा गुरुवारी (दि. 6) महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, आर्थिक व सामाजिक विकासातील तसेच संगीत व लोककला क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, राज्यात झालेल्या उत्साहपूर्ण स्वागताने आपण भारावून गेलो आहोत. हा प्रदेश विविधतेने नटलेला आहे. येथे सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला आहे.
नागपूर, पुणे, मुंबई येथे देशभरातील लोक वास्तव्यास येतात. त्यांचेही या देशाच्या विकासात योगदान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, देशाच्या आर्थिक विकासात या शहराचे मोठे योगदान आहे. साखर निर्यातीत जगात देशाचा दुसरा क्रमांक आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.
राज्याला समृद्ध इतिहास आहे. निसर्गरम्य पर्यटन स्थळे हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत तुकाराम, यांच्या विचाराने राज्यात समानता, स्नेह आणि भक्ती आहे आणि यामुळे एकात्मिक भाव जपला जात आहे. आत्मसन्मान शिकविणाऱ्या शिवाजी महाराजांचा महान इतिहास या भूमीला लाभला आहे.
महिलांचे आणि मागासवर्गाचे शिक्षण आणि विकासासाठी फुले दाम्पत्य आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची प्रभावशाली परंपरा समतामूलक समाज निर्मितीसाठी महत्वपूर्ण ठरली आहे. तसेच, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यासारख्या महान समाजसुधारकांचाही इतिहास या राज्याला आहे. संगीत कला क्षेत्रातही या राज्यातील कलाकारांचे मोठे योगदान आहे. लोककला, लोकनृत्य, चित्रपट यामुळे राज्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे कार्य आपले शासन करीत आहे. यामुळे हे महान राष्ट्र आहे असे सांगून, राज्यातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आशीर्वाद दिले.
कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, उद्योजक राजश्री बिर्ला आदी उपस्थित होते.