सुप्रिया सुळेंसमोर बारामतीची खासदारकी वाचवण्याचे आव्हान, अजित पवार विरोधात गेल्याने टेन्शन हाय
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक केल्यामुळे सर्वात मोठा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बसू शकतो. जिल्ह्यातील ६ पैकी एकही आमदार सुप्रिया सुळेंच्या गटात नाही.
अजित पवार यांच्या शरद पवार विरोधात जाण्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. यात सर्वात मोठी अडचण होणार आहेती सुप्रिया सुळे यांची कारण त्या बारामती लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघात ६ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी फक्त २ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. या दोन पैकी १ जागा अजित पवार (बारामती) तर दुसरी इंदापूरची असून तेथे दत्ता भरणे हे आमदार आहेत. भरणे हे अजित पवारांच्या गटात आहेत. तर अन्य ४ विभानसभेपैकी २ भाजपचे आणि २ काँग्रेसचे आमदार आहेत.
२००९ पासून सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना १ लाखाहून अधिक मतांची आघाडी दिली होती. सुप्रिया सुळे यांचा विजय १ लाख ५० हजार मतांनी झाला होता. यात अजित पवारांच्या मतदार संघाचा मोठा वाटा होता.आता अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम सुप्रिया सुळेंच्या मतांवर होऊ शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कंचन कुल यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली होती. त्यांनी सुळेंना कडवी टक्कर दिली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात शहरी मतदार देखील अधिक आहेत. पुणे शहरातील अनेक भाग या मतदारसंघात येतो. यात खडकवासला, कोथरूड आणि कात्रजचा समावेश आहे. त्यामुळे ही जागा सुप्रिया सुळेंसाठी अडचणीची होऊ शकते.