ट्राफिक पोलिसांकडे येणार अद्यावत कॅमेरे, वाहतूक नियम तोडणाऱ्यावर राहणार बारीक लक्ष, पुण्यात आता फोटोवरून कारवाई.
पुणे शहरात आता वाहन नियम तोडणं वाहनचालकांना चांगलंच महागात पडणार आहे. आत्ता वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर चौकातील सीसीटीव्हीमधून कारवाई केली जात आहे. त्यानंतरही अंतर्गत रस्त्यावर वाहतूक नियमभंगाच्या घटना वाढत असल्यामुळे आता पोलिसांच्या वाहनांवर बसविलेल्या कॅमेऱ्यांमार्फत फोटो काढून कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा पोलिसांच्या गाड्यांवर आधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुध्द वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष ई-चलनद्वारे कारवाई केली जाते. त्याचबरोबर चौकाचौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने कारवाई केली जाते. तरीही गेल्या वर्षात पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ३१५ प्राणांतिक अपघात झाले आहेत. तर, गंभीर स्वरूपाचे ४५२ आणि किरकोळ ६० अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ लाख ३४ हजार ६३१ वाहनांवर कारवाई केली आहे. तरीही वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडी व वारंवार अपघात होण्याचे प्रमाणही वाढत आहे.ही बाब लक्षात घेऊन शहराच्या अंतर्गंत रस्त्यावर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी एका खासगी कंपनीने तयार केलेले अद्ययावत कॅमेऱ्याचा उपयोग केला जाणार आहे. पोलिसांच्या दहा वाहनांवर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या मदतीने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे फोटो घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता पोलिसांच्या वाहनांवर बसविलेल्या कॅमेऱ्यामध्ये फोटो घेतल्याची तारीख, वेळ, ठिकाण (अक्षांश/रेखांश) इत्यादी गोष्टी येतात. त्यामुळे पोलिस फोटो पाहून कारवाई करू शकतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची वास्तवात आकडेवारी जास्त आहे. या कॅमेऱ्यामुळे वाहतूक नियमभंग करणारे वाहनचालकांवर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई होणार असल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांना चाप बसणार आहे. पर्यायाने वाहतुकीस शिस्त लागून वाहतूक सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
शहरातील मुख्य चौकाबरोबरच आता अंतर्गत रस्त्यावरही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे.