पुणे परिमंडळातील वीजग्राहक ऑनलाइन भरणा करण्यात अव्वल, राज्यात एक कोटी १० लाख ग्राहकांनी भरले पाच हजार ७५० कोटी
महावितरणाच्या तिजोरीत दरमहा कोटींची भर करून पुणेकर यामध्ये अव्वल ठरले आहेत.महावितरणच्या दरमहा सरासरी एक कोटी दहा लाख वीजग्राहकानी (६५ टक्के) पाच हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा घरबसल्या आणि सुरक्षित पद्धतीने केला आहे. त्यामध्ये पुणे परिमंडलातील २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी सर्वाधिक १२०२ कोटी ७६ लाख रुपयांचा वीजबिलांचा भरणा करून राज्यात आघाडी घेतली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत ३५ टक्क्यांची भर पडली आहे.
महावितरण’च्या उच्चदाब आणि लघुदाब मिळून एक कोटी १० लाख ग्राहकांनी पाच हजार ७५० कोटी रुपयांचा ऑनलाइन भरणा केला आहे. त्यामध्ये पुणे परिमंडळातील वीजग्राहक आघाडीवर असून, त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील १९ लाख ७ हजार ग्राहकांनी ७२५.७९ कोटी रुपये आणि भांडूप परिमंडलातील १७ लाख ३१ हजार ग्राहकांनी १००५ कोटी ४१ लाख रुपयांच्या बिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.बारामती परिमंडळातील १० लाख ६८ हजार ग्राहकांनी ५१९.३५ कोटी रुपये आणि नाशिक परिमंडलातील १० लाख ५३ हजार ग्राहकांनी ४६९.६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.
ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत वीजबिलामध्ये ०.२५ टक्के आणि वीजबिलाचा तातडीने भरणा केल्यास एक टक्का अशी एकूण १.२५ टक्के सवलत ग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिलाचा भरणा नि:शुल्क आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या ‘एका क्लिक’वर वीजबिल भरण्याची सुरक्षित आणि ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी वीजबिले ऑनलाइन माध्यमातून भरावीत, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.