शरद पवार यांचा पुन्हा पावसात भिजलेला फोटो आणि सुप्रिया सुळेंची पोस्ट व्हायरल
शरद पवार आणि पाऊस हे समीकरण संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. 2019 च्या सभेत भर पावसात शरद पवार यांनी साताऱ्यात आपलं भाषण सुरु ठेवलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणं बदलली.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज पुन्हा एकदा हे समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक जिल्ह्यात असून येवला येथील सभेसाठी ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या दरम्यान शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले असून त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाचं वातावरण बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुसळधार पावसात मुंबईहून नाशिककडे निघालेल्या शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केलं. यादरम्यान, पावसाचे दिवस असतानाही दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांचा पावसात भिजलेला एक फोटो त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. ‘भाग गए रणछोड सभी, देख अभी खडा हूँ मै, ना थका हूँ, ना हारा हूँ, रण मे अटल खडा हूँ मै’ असं कॅप्शन त्यांनी शरद पवारांच्या फोटोला दिलेलं आहे. ‘सगळे पळपुटे पळून गेले तरी, मी अजूनही उभा आहे. मी ना थकलोय, ना हरलोय, रणामध्ये अटलपणे उभा आहे’ असा अर्थ या ओळींचा होतो.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या फोटोतून शरद पवारांची लढाऊ वृत्ती दर्शवली आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अनेक बडे नेते अजित पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काही मोजकेच आमदार आणि नेते उरले आहेत.
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी आपल्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे आणि या दौऱ्याची सुरुवात त्यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंधातून केली आहे. या दरम्यान ते पुन्हा एकदा पावसात भिजले असून हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजकारणात आता कोणतं नवीन समीकरण दिसणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
मी अजून म्हातारा झालेलो नाही…
येवल्यातील सभेआधी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वयाबाबत टीका करणाऱ्या लोकांना ठणकावलं आहे. मी वयाच्या 82 व्या वर्षीही काम करू शकतो, मी अजून म्हातारा झालेलो नाही, असं म्हणत निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. तर जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला जनमानसात नेणार असल्याचं सांगत ‘ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ’ अशा शायराना अंदाजात वय झाल्याच्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.