वंदे भारतसह एक्स्प्रेस ट्रेनच्या एक्झिक्युटीव्ह चेअर आणि एसी चेअरच्या तिकीट दरात २५ टक्क्यांपर्यंत कपात
देशातील सर्वच एक्सप्रेस ट्रेनच्या एक्झिक्युटीव्ह चेअर आणि एसी चेअरच्या तिकीट दरात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसमध्येही ही दरकपात लागू होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. त्यामुळे, प्रवाशांना निश्चितच दिलासा मिळणार असून आता वंदे भारत एक्सप्रेसला अधिक पसंती मिळेल.
लांब पल्ल्याच्या अंतरा वरील मार्गावर सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. मात्र, तिकीट दर जास्त असल्याची तक्रारही केली जात होती. सद्यस्थिती देशातील २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून पाच गाड्या धावत आहेत. नागपूर बिलासपूर, मुंबई – गांधीनगर, मुंबई – साईनगर शिर्डी, मुंबई सोलापूर आणि मुंबई गोवा या मार्गावर ही हाय स्पीड वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे. तिकीट दरात कपात झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.