पुणे व पिंपरी चिंचवड उद्योग क्षेत्रातील वीजयंत्रणा सुधारणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतील मोठ्या औद्योगिक वसाहतींना वारंवार भेडसावणारी खंडित वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी ‘महावितरण’ने ‘एमआयडीसी विद्युत यंत्रणा सुधारणा योजना’ हाती घेतली आहे. त्याअंतर्गत रामटेकडी, आकुर्डी, भोसरी, तळवडे आणि हिंजवडी एमआयडीसी परिसरात २९ कोटी २१ लाख रुपये खर्चून वीजयंत्रणेचे सक्षमीकरण केले जाणार आहे. औद्योगिक वसाहतींना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. त्या अंतर्गत पाच औद्योगिक वसाहतींच्या परिसरात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये ३७.४५ किलोमीटरलांबीच्या नवीन भूमिगत उच्चदाब वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यासोबतच पंधरा नवीन वितरण रोहित्रे. ६६ नवीन रिंग मेन युनिट आणि १५५ नवीन फीडर पिलर्स (वितरण पेट्या) उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘महावितरण’च्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.
चाकण विद्युत यंत्रणांचे सशक्तीकरण
विद्युत यंत्रणा सुधारणा योजने’ अंतर्गत ‘चाकण एमआयडीसी’मध्येही १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांची सुरुवात झाली. त्याअंतर्गत ३५ किलोमीटर लांबीच्या नवीन भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार असून, तीन नवीन स्विचिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. एका स्विचिंग स्टेशनच्या क्षमतेत वाढ केली जाणार आहे. अतिभारित वीजवाहिन्यांचे विभाजन करून नवीन वीजवाहिन्या टाकणे आणि सहा नवीन रिंग मेन युनिट उभारणे आदी कामे सुरू आहेत, असेही ‘महावितरण’तर्फे सांगण्यात आले.
मध्यंतरी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर उद्योग संघटनांनी खंडीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बैठक घेतली होती.