पिंपरी चिंचवड पोलिसांची18 गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई..पिंपरी अतुल पवार तर चाकण मधील गणेश चव्हाण टोळ्यावर मोका
दोन दिवसांपूर्वी चिखली, तळेगाव आणि सांगवी येथील तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 मोका लावल्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी काही गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करत, चाकण मधील गणेश चव्हाण आणि पिंपरी मधील अतुल पवार या टोळ्यांमधील 18 जणांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे.
चाकण परिसरातील टोळी प्रमुख गणेश उर्फ लहु रामभाऊ चव्हाण (वय 28, रा. मराठी शाळेजवळ, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे), टोळीतील सदस्य संतोष कोंडिराम उर्फ कोनिराम मोहिते (वय 28, रा. रांजणगाव, पुणे), विकी शिवाजी जाधव (वय 24, रा. डोंगर तळ, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्या विरोधात दरोडा घालणे, जबरी चोरी, चोरी, विश्वासघात करून चोरी करणे, विनापरवाना घातक हत्यार जवळ बाळगणे असे एकूण दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी परिसरातील टोळी प्रमुख अतुल ऊर्फ चांड्या अविनाश पवार (वय 30, रा. मिलिंदनगर, पिंपरी), टोळीतील सदस्य किरण उर्फ केडी प्रकाश डोंगरे (वय 18, रा. मिलिंदनगर पिंपरी), आदित्य उर्फ मोहित संजय सिंग (वय 21, रा. काळेवाडी), अनिकेत मनोज हातमकर (वय 22, रा. घरकुल चिखली), गौरव केशव इंगोले (वय 23, रा. काळेवाडी), राहुल चंद्रभान यादव (वय 20, रा. मोशी), साईनाथ राजेश पाटोळे (वय 19, रा. जाधववाडी, चिखली), अशोक मुन्नालाल ठाकूर (वय 21, रा. इंदिरानगर पिंपरी), तरबेज उर्फ बिल्ला मोहम्मद शेख (वय 22, रा. रुपीनगर निगडी), सुबोध प्रदीप गायकवाड (रा. मिलिंद नगर, पिंपरी), अवी निंबाळकर, शिवा संजय सिंग (रा. नढेनगर, काळेवाडी) आणि तीन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, कट रचणे, पुरावा नष्ट करणे, दरोडा घालणे, दरोडयाची तयारी करणे, जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सदोष मनुष्य वध करणे, विनयभंग करणे, खंडणी मागणे, दुखापत करणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, वाहने तोडफोड, गैरकायद्याची मंडळी जमविणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे व अग्नि शस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण 21 गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड व पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.
वरील दोन्ही टोळ्यांमधील सर्व आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मोकाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.चालू वर्षात जानेवारी ते जुलै या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सोळा संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोका लावण्यात आला आहे. या टोळ्यांमधील एकूण 187 आरोपींवर ही कारवाई झाली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी उप आयुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, वैभव शिंगारे, राम राजमाने, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, नितीन गुंजाळ, ओंकार बंड यांनी केली आहे.