पिंपरी:वकिलाची झाली एक कोटी 37 लाखाची फसवणूक..जमीन खरेदी व्यवहाराचे आमिष
जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने खोटे दस्तावेज तयार करून एक कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सन 2022 ते 4 एप्रिल 2023 या कालावधीत खराळवाडी पिंपरी येथे घडली.
जयवीर अमरबहादुर यादव (वय 42, रा. खराळवाडी पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार विशाल माणिकराव राऊत (वय 30, रा. चाकण), माणिक देवराम राऊत (वय 62) आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी यांना भांबोली गावातील 145 गुंठे जमीन खरेदी करून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्या व्यवहारापोटी शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेऊन त्या सह्यांचा कायदेशीर कामकाजासाठी वापर केला.त्यातून खोटे दस्तावेज तयार करून फिर्यादी यांनी व्यवहारापोटी दिलेले एक कोटी 36 लाख 98 हजार रुपयांचा आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस आधिक तपास करीत आहेत.