निगडी:केवळ चप्पल दुकानाबाहेर काढण्यास सांगितले आणि…?? व्यापाऱ्यांकडून बंदची हाक
निगडी मधील रुपीनगर येथील कपड्याच्या दुकानात दुकानदाराने गिऱ्हाईकाला चपला बाहेर काढण्यास सांगितले. या कारणावरून टोळक्याने दुकानाबाहेरील वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, रुपीनगर येथील एका कपड्याच्या दुकानात पाच जणांचे टोळके गेले. मात्र पाऊस सुरू असल्याने दुकानदाराने चपला बाहेर काढण्यास सांगितले. याचा राग आल्याने पाच जणांच्या टोळक्याने दुकाना समोरील वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
निगडी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
टोळक्याने केलेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर रुपीनगर परिसरातील व्यापाऱ्यांनी रविवारी (दि. 9) बंद पाळण्याची हाक दिली आहे. या बंदला काही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून रविवारी अनेक दुकाने बंद ठेवली.