दिघी:सोसायटी पार्किंग मधील वाहनांना मोठी आग-दिघी येथील घटना
रविवारी (दि. 9) पहाटे सावंत नगर, दिघी येथे सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना काही अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली. यात चार वाहने जळून खाक झाली असून त्यात तिघेजण जखमी झाले आहेत.
सावंत नगर दिघी येथील ओम अपार्टमेंट मध्ये रस्त्याकडील बाजूला सोसायटीच्या पार्किंग मध्ये चार दुचाकी वाहने पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी कपडा पेटवून दुचाकीच्या टायर जवळ लाकडाने ढकलला. त्यामुळे एका दुचाकीने पेट घेतला. ही आग जवळच असलेल्या अन्य तीन दुचाकी वाहनांना लागली. आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धूर झाला.
पार्किंगमध्ये आग लागल्याने धूर घरांमध्ये जाऊ लागला. त्यामुळे घरातील नागरिक बाहेर आले. त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र जिन्याच्या समोरील बाजूस आग लागली होती. त्यामुळे नागरिकांनी इमारतीच्या छतावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र छतावर जात असताना त्यांना धुरामुळे रस्ता दिसत नव्हता. नागरिकांनी जिन्यातील रेलिंगला पकडून वर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रेलिंग देखील मोठ्या प्रमाणात गरम झाल्याने तिघेजण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच भोसरी अग्निशमन उपविभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तत्पूर्वी परिसरातील नागरिकांनी वाहनांवर पाणी मारून आग आटोक्यात आणली होती. प्रकाश संग्राम वाघन्ना (वय 48) आणि अन्य दोघे जखमी झाले.