मोशीची ओळख आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क व्हावे..महेश लांडगे
पिंपरी : महापालिका प्रशासनाने मोशी येथील आरक्षित जागेवर ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क’ विकसित करावे आणि पर्यटन क्षेत्रात शहराचे नाव जगाच्या नकाशावर येण्यासाठी प्रकल्पाच्या कामाला चालना द्यावी, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासक शेखर सिंह यांना केली आहे.
मोशी येथील आरक्षित जागेवर सिंगापूर येथील सेन्टॉस्सा पार्कप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ साकारण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी,असे आमदार लांडगे यांनी प्रशासक सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,तसेच महापालिके कडील मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील गट क्रमांक ६४६ सरकारी गायरान जमिनीवर ३३.७२ हेक्टरचे क्षेत्र सफारी पार्क म्हणून आरक्षित आहे. या आरक्षणाचा क्रमांक १/२०७ आहे. सफारी पार्कची आरक्षित जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सफारी पार्क’ विकसित होणार असल्याने गावाच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे. त्यामुळे पार्कचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे.
मोशी परिसरात पिंपरी-चिंचवडमधील कचरा डेपो आहे. संपूर्ण शहरातील कचऱ्याचा भार मोशी आणि परिसरातील नागरिक सहन करीत आहेत. आगामी काळात मोशीची ओळख ‘मोशी कचरा डेपो’ अशी न राहता मोशीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी पार्क म्हणून निर्माण व्हावी, अशी भावना आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष,
आमदार,महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली आहे.