मावळ: पवना धरणातील पाणीपातळी वाढली, पाणी कपात टळली
पावसाळा सुरू झाल्यापासून पाणी साठ्यात 11.37 टक्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा वाढत आहे. 18 टक्क्यांवर आलेल्या धरणात सध्यस्थितीत 29. 27 टक्के पाणीसाठा झाला आहे.
जून महिन्यामध्ये पाऊस नसल्याने आणि तापमानामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी झाली होती. पाणीसाठा18
टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पाणीकपात लागू करण्याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नियोजन सुरू केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे धरणातील पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. डोंगर, ओढे पाण्याने वाहू लागले आहेत. ते पाणी धरण क्षेत्रात जमा होऊ लागले आहे.
1 जूनपासून धरण परिसरात 627 मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात सध्या 29.27 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 27.78 टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा दीड टक्के अधिक पाणीसाठा आहे.धरण क्षेत्रात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झाली नाही. नदी, नाले, ओढे यातून धरणात पाणी येत आहे. आजमितीला धरणात 29.27 टक्के पाणीसाठा असल्याने पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी सांगितले.