निगडी:तथाकथित भाईंची (कोयता गँग) पोलिसांकडून काढली धिंड
रात्रीच्या वेळी निगडी रुपीनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या तसेच एकावर कोयत्याने वार करीत, दुकान व वाहनांची तोडफोड करणाऱ्या सहा आरोपींची पोलिसांनी धरपकड करीत रुपीनगर आणि ओटास्कीम परिसरातून धिंड काढली आहे.
चिखलाने माखलेली चप्पल बाहेर काढायला सांगितल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री टोळक्याने दुकानातील कामगारावर कोयत्याने वार केले. तसेच दुकानावर दगडफेक केली. हातातील कोयते नाचवत आम्ही इथले भाई आहोत, कोण आमच्या नादाला लागतोय तेच पाहतो, असे म्हणत परिसरातील पाच वाहनांची तोडफोड करीत परिसरात दहशत निर्माण केली होती.
यातील सहा आरोपींना अवघ्या काही तासांत पोलिसांनी अटक केली. ही दहशत मोडित काढण्यासाठी पोलिसांनी त्यांना हातात बेड्या घालून रुपीनगर आणि ओटास्कीम परिसरात तपासाकरिता फिरविले.