महाराष्ट्र:शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर चर्चा
काल रात्री तीन तास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर तब्बल एक तास नऊ मिनिटांनी अजित पवार दाखल झाले आणि एक तास आगोदरच मिटिंग संपवून ते आपल्या देवगिरी निवासस्थानी रवाना झाले.दरम्यान, या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर चर्चा झाल्याची माहीती समोर आली आहे. दरम्यान या तीन तांसाच्या बैठकीत खाते वाटपासंदर्भातही चर्चा झाल्याची माहीती आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्री असू शकतात. तर आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या 29 असून आणखी 14 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भाजप आणि सेनेतील मंत्रिपदाच्या प्रतिक्षिते असलेल्या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा देखील समोर आले आहे.आधीच चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीला आणखी चार मंत्रीपदे मिळणार आहेत. यामध्ये एक कॅबिनेट तर इतर तीन राज्यमंत्री असतील, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राष्ट्रवादीला 14 पैकी चार मंत्रिपद मिळाले तर भाजप आणि शिवसेनेचे काय होणार हा प्रश्न आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबद्दलचे वृत्त दिले आहे.