पुणे महापालिकेचा स्तुत्य उपक्रम,…महापालिकेची सुरक्षा आता तृतीयपंथीयांच्या हातात
देशाला नवा सामाजिक पायंडा घालून देण्यात अग्रेसर असणारे शहर म्हणजे पुणे. समाजात अनेक सकारात्मक क्रांतिकारी बदल घडवण्याची सुरवात याच शहरातून झाली. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंत पुण्याने आपली ही ओळख टिकवून ठेवली आहे. आता देखील पुण्यात असाच एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलाय. पुणे महानगर पालिकेने आता सुरक्षारक्षक म्हणून तृतीयपंथीयांना संधी दिली आहे.
महापालिकेत सुरक्षा रक्षक २५ तृतीयपंथीयांना म्हणून नेमण्यात आले आहे. २५ पैकी १० जणांना नियुक्त करण्यात आले आहे. पाच तृतीयपंथीयांना मुख्य इमारतीमध्ये तर इतर पाच जणांना महापालिकेच्या शहरातील इतर वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये नेमण्यात आलं आहे.
तृतीयपंथीय समाज पैसे कमवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. काही ठिकाणी सिग्नलवर तर काही ठिकाणी गुन्हेगारीत हा समाज दिसतो. यामुळे सगळ्याच तृतीयपंथीयांबद्दल गैरसमज पसरतो, असं या तृतीयपंथीयांचं म्हणणं आहे. उपजीविकेसाठी तृतीयपंथीयांना कामं मिळताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा यांना काम देण्यासाठी लोक नकारच देतात. त्यामुळे तृतीयपंथीय समाज पैसे कमवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात असे त्यांचे म्हणणे आहे.
मात्र आता पुणे महापालिकेने तृतीयपंथीयांना संधी देऊन नवा आदर्श घालून दिला आहे. अशा स्वरूपाची कामे करण्याची संधी मिळाल्याने या समाजाकडे पाहण्याचा लोकांच्या दृष्टिकोनात बदल होईल, असं तृतीयपंथीयांना वाटत आहे. आता महापालिकेची सुरक्षाच तृतीयपंथीयांच्या हातात आल्याने समाजात वावरताना कसलाही किंतु परंतु मनात येणार नाही तर बाकी वाममार्गाला गेलेला तृतीयपंथीय समाज देखील मुख्य प्रवाहात येईल, अशी आशा या तृतीयपंथीयांनी व्यक्त केली आहे.