महाराष्ट्र :अजित पवारांकडे अर्थखाते देण्यास बच्चू कडूसह शिवसेना आमदारांचा विरोध
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाली. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना असुरक्षित वाटू लागले आहे. यावरून सरकारमध्ये कुठेतरी मोठी नाराजी आहे. सर्व घडामोडी अचानक झाल्या. त्यामुळे चिंतेचा विषय आहेच. अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे जाऊ नये, ही शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप द्यायचे. आताही तेच होणार आणि इतर आमदारांकडे दुर्लक्ष करणार. त्यामुळे अर्थमंत्री पदी अजित पवार नकोच, अशी ठाम भूमिका पुन्हा एकदा आ. बच्चू कडू यांनी मांडली.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन इंजिनच्या सरकारमध्ये बिघाडसुद्धा होऊ शकतो. विस्तारानंतर आमदारांची नाराजी दूर करण्याचं मोठे आव्हान सरकारसमोर असणार आहे. बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण तिसरा आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदे गेली. त्यामुळे आधी आलेल्या आमदारांवर अन्याय होणारच आहे. राष्ट्रवादी आपल्या घासातला घास खात आहे, अशी आमदारांची भावना झाली आहे. त्यामुळे आपला नंबर कटला, तर नाराजी असणारच आहे. कुणाला कोणते खातं द्यायचे, पालकमंत्रिपदी कोणत्या जिल्ह्याचे कुणाला द्यायचे, अशा अनेक भानगडी आहेत. शिंदे गटाला किती मंत्रिपदे मिळतील, याची मला कल्पना नाही, पण तिन्ही नेत्यांनी चांगल्या पद्धतीने सरकार चालवले तर महायुती घट्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.