प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादमुळे लवकरच ‘जन-शिवनेरी’ राज्यातील इतर मार्गावर देखील धावणार
प्रायोगिक तत्वावर नाशिक-पुणे (शिवाजीनगर) मार्गावर १० जुलै पासून विनावाहक सुरू करण्यात आलेल्या “जन-शिवनेरी” बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. अत्यंत सुरक्षित, अत्याधुनिक सेवा-सुविधा असलेली वातानुकूलित ‘ शिवनेरी ‘ बससेवा मुंबईच्या बाहेर १० जुलै पासून “जन-शिवनेरी” या नावाने चालविण्यात येत आहे.
वोल्वो आणि स्कॅनिया या कंपनीच्या अत्याधुनिक शिवनेरी बसेस अत्यंत माफक दरामध्ये नाशिक-पुणे (शिवाजीनगर) या मार्गावर “जन-शिवनेरी” या नावाने धावत असून दिवसभरात त्यांच्या १८ फेऱ्या होतात. या बसचे नाशिक-पुणे (शिवाजीनगर) प्रवासाचे भाडे ५०० रुपये आहे तर महिलांना ५० टक्के सवलतीमुळे २५५ रुपयात या अत्याधुनिक, सुरक्षित व वातानुकूलित बससेवेचा लाभ घेणे शक्य झाले आहे.
लवकरच राज्यातील इतर काही मार्गावर “जन-शिवनेरी” ही सर्वसामान्यांसाठी माफक दरातील अत्याधुनिक व वातानुकूलित बससेवा सुरु करण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे,असे एसटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.