दुचाकी पार्सलसाठी पुणे रेल्वे स्टेशनवर ठेकेदारांकडून नागरिकांची लूट
पुणे रेल्वे स्टेशन येथून नागरिकांना दुसऱ्या शहरात त्यांची दुचाकी पार्सल करण्याची सुविधा दिली जाते. परंतु या दुचाकी पार्सल करण्यासाठी गेलेल्या नागरिकांची ठेकेदार व काही व्यक्तींकडून लूटमार केली जात आहे. दुचाकी पॅकिंगसाठी साडेतीनशे रुपये शुल्क असताना तीन ते सहा हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांच्या पाहणीत आले आहे. त्यामुळे आता ठेकेदारावर कारवाई केली जाणार आहे.
दिवसाला साधारण ५० दुचाकी पुण्यातून इतर शहरांत पाठविल्या जातात. कधी-कधी हा आकडा ८०च्या वर देखील असतो. दुचाकी पार्सल करण्याअगोदर तिचे पॅकिंग केले जाते. त्यासाठी रेल्वेने याचे खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे.
२०१९ पूर्वी ताडीवाला रोड परिसरातील काही नागरिक दुचाकी पॅकिंग करून देण्याचे काम करीत होते; पण रेल्वेने २०१९ नंतर कामात सुसूत्रता आण्यासाठी ते काम ठेकेदाराला देण्यास सुरुवात केली आहे. सध्या चेन्नई येथील ठेकेदाराला दुचाकी पॅकिंगचे काम देण्यात आले आहे. मात्र, या ठेकेदाराकडून जुन्याच माणसांना पॅकिंगचे काम दिले जात आहे. दुचाकी पॅकिंगसाठी साधारण ३४३ रुपये लागतात. असे असताना ठेकेदाराकडून दुचाकी पॅकिंग करणारी माणसेच नागरिकांकडून तीन ते सहा हजार रुपयांपर्यंत पैसे घेत आहेत. ते दुचाकी पॅकिंगपासून बुकींगपर्यंत सर्व गोष्टी करतात. यामध्ये नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे दुचाकी पॅकिंगच्या ठिकाणी जादा पैसे आकारून लुटमार केली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी मंगळावरी दुचाकी पार्सल व पॅकिंगच्या भागाची पाहणी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्याकडून ठेकेदाराची चौकशी सुरू झाली आहे.