देश:सचिन व शुभमनचा विक्रम मोडत ‘यशस्वी’ ची यशस्वी वाटचाल
यशस्वी जैस्वाल क्रिकेटच्या जगतात नक्कीच खूपच यशस्वी होणार याची चिन्हे स्पष्टपणे पावलोपावली दिसत आहेत. पदार्पणातच तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिसरा सर्वोच्च सरासरी असलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ८०.२१ आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणातच त्याने मोठा टप्पा गाठला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला, तर त्याचा सहकारी शुभमन गिललाही त्याने मागे टाकले.
मुंबईचा झंझावाती फलंदाज यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने टीम इंडियामध्ये सलामीवीर म्हणून आपली जागा निर्माण केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या संघात पहिल्यांदाच यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला आणि त्याला भारताकडून पदार्पण करायला वेळ लागला नाही. कर्णधार रोहित शर्माकडून त्याला कॅप मिळाली. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या फायनलसाठी तो स्टँडबाय खेळाडू म्हणून भारतीय संघाचा भाग होता. देशांतर्गत सर्किटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर यशस्वीने भारतीय संघात स्थान मिळवले.उल्लेखनीय म्हणजे पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी जैस्वालने ४० धावा केल्या आहेत. त्याने ७३ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले. त्याच्यासोबत रोहित शर्माने ३० धावा करताना ६५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार ठोकला. हे दोन्ही फलंदाज नाबाद असून आज त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.