देश:चांद्रयान-३ मोहिमेत महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील दोघांचा समावेश
चांद्रयान- ३ ही मोहीमेची आज यशस्वी सुरुवात झाली. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील दोन व्यक्तींचा मोठा सहभाग होता. त्यांचाही ही मोहीम यशस्वी होण्यात मोठा वाटा आहे. जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे रहिवासी असिफभाई महालदार आणि तेथेच शिक्षण घेतलेले आणि आता इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असलेले मयुरेश शेटे यांचा समावेश आहे.
मोठी आग लागल्यानंतर आवश्यक असणाऱ्या फायर सेफ्टीच्या साठी लागणारी प्रतिबंधात्मक आग्निशमक यंत्रणेचे सहा कोटींचे कॉन्ट्रॅक्ट असिफ महालदार यांना रिलायन्स फायर सिस्टीम कंपनीच्या माध्यमातून मिळाले होते. त्यांनी श्रीहरीकोटा येथे ही यंत्रणा कार्यान्वित केली होती.
राजुरी गावामध्ये असलेल्या शाळेच्या विद्या विकास मंदिराचे माजी विद्यार्थी आणि याच विद्यालयाचे माजी प्राचार्य कैलास शेटे यांचे चिरंजीव मयुरेश शेटे हे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा देखील या मोहिमेत मोठा सहभाग आहे.
देशाच्या या अभिमानास्पद कामगिरीत जुन्नर तालुक्यातील राजुरी गावच्या या सुपुत्रांचा सहभाग असल्यामुळे गावाचे नाव देश पातळीवर पोहचवण्याचे काम या दोघांनी केले आहे. त्यामुळे दोघांचे देखील गावाने अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.