पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाणीपट्टी वसुली आता मिळकत कर विभागाकडे वर्ग
पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी पुरवठा विभागाकडून 60 कोटींपेक्षा अधिक रूपयांची थकबाकी आहे. तसेच या विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसून थकबाकीही वाढत असल्याने पाणीपट्टी वसुली कर आकारणी व कर संकलन विभाग करणार आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जारी केला आहे.
एकीकडे कर संकलन विभागाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत असताना पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावी तशी पाणीपट्टी वसुली होत नाही. शहरात सद्यस्थितीत 6 लाख 2 हजार मिळकती आहेत. शहरात घरगुती, व्यावसायिक मिळून असे 1 लाख 75 हजार अधिकृत नळजोड आहेत. महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने गतवर्षी 817 कोटी रूपये वसूल केले आहेत. तर पाणी पुरवठा विभागाची नळजोडधारकांकडे 60 कोटींपेक्षा अधिक रूपयांची थकबाकी आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या 28 मीटर निरीक्षकांची आस्थापना करसंकलन विभागात वर्ग केली आहे. ते करसंकलन विभागाच्या अंतर्गत पाणीपट्टी वसुलीचे कामकाज करणार आहे.नळजोडाची माहिती, संगणकीय प्रणाली तसेच, पाणीपट्टीचे बिल वाटपाचे काम करत असलेली खासगी एजन्सी आदींवर करसंकलन विभागाचे नियंत्रण असणार आहे.मात्र, मीटर निरीक्षकांवर तांत्रिक नियंत्रण पाणीपुरवठा विभागप्रमुखांचे राहणार आहे.