पिंपरी चिंचवड:भाडेकरूंची माहिती पोलिस स्टेशनला दिली नाही तर घरमालकावर गुन्हा
भाडेकरूंची माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली तर आता तुरुंगाची हवा खावी लागू शकते. हो, हे विधान अगदी सत्य आहे. अनवधानाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला आपण भाडेकरू म्हणून आश्रय देऊ नये अन् त्याच्याकडूनच गुन्हेगारी कृत्य होऊन शहराची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, अशा प्रकारांना प्रतिबंध व्हावा म्हणून आता भाडेकरूंची माहिती घरमालकाने पोलिसांत देणे वाकड पोलिसांनी बंधनकारक केले आहे. वाकड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
नऊ जुलैला मध्यरात्री दीडच्या सुमारास डांगे चौकातील लक्ष्मी तारा कॉम्प्लेक्समधील फेडबँक फायनाशिंग सर्विसेस लिमिटेड, फास्ट गोल्ड लोन या बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. दरोड्यातील आरोपी है। याच कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने राहत होते.फ्लॅट मालकाने पोलिसांच्या भाडेकरू रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी फ्लॅटमालक पुष्पपथी गोविंद चेटीयार (वय ७०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व व्यापारी, सोसायटी रहिवासी, फ्लॅट मालक, नागरिकांना पोलिसांनी आपल्या व्यापारी, रहिवासी सोसायटीमध्ये ठेवण्यात येणाऱ्या भाडेकरूंची माहिती व योग्य कागदपत्रांची पडताळणी करून तसेच त्यांचे भाडेकरार करून त्याबाबतची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा माहिती लपविल्याचे उघड झाल्यास गुन्हा दाखल करून अटक करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.