ब्रेकिंग: अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे अनेक मंत्री शरद पवार यांच्या भेटीला.
राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली असताना आज नाट्यमयरित्या अजित पवार यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतलेले अनेक मंत्री शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. यामध्ये स्वत: अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या मंत्र्यांचा आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचाही समावेश आहे.
अजित पवार गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल होताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेदेखील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आयोजित केलेली बैठक अर्धवट सोडून वाय. बी. चव्हाण सेंटरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन गटांच्या मनोमिलनासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यात विरोधकांचे संख्याबळ घटले असताना. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची कसोटी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.