चाकण येथे बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, गुन्हेगारास अटक
माणिक चौक चाकण येथील इंडियन ओव्हरसीज बँक आणि मेदनकरवाडी चाकण येथे असलेले बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या घटना शनिवारी (दि. 15) पहाटे दीड आणि सव्वादोन वाजता घडल्या. मोहम्मद सरफराज कलामुद्दिन अन्सारी (वय 26, रा. जमोरही, जि. रोहतास, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम सेंटर आहे.शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये आली. त्या व्यक्तीने दगडाने एटीएम मशीनचा चेस्ट डोअर दगडाने फोडले.त्याच्या आतील बाजूचा पिन कोड असलेला तिजोरीचा दरवाजा त्याला उघडता आला नाही. त्यामुळे तो एटीएम सेंटर मधून निघून गेला.
हा प्रकार एटीएम सेंटर मध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. बँकेच्या नियंत्रण कक्षात असलेल्या कर्मचाऱ्याने महाराष्ट्र बँकचे चॅनल मॅनेजर भगवंत मुळे यांना माहिती दिली त्यानुसार त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनतर पहाटे सव्वादोन वाजता इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये एटीएम मशीनचे कॅश कॅबीनचे पासवर्ड आणि कॅश डिस्पेन्सर तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी माणिक चौकात धाव घेतली.
माणिक चौक, चाकण मधून संशयाच्या आधारे मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. चाकण पोलीस दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत.