पिंपरी चिंचवड : अजूनही 700 कोटींची मालमत्ता कर थकबाकी, 25 हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्यांना जप्तीच्या नोटिसा
वारंवार पाठपुरावा करून, आवाहनाची वेगवेगळी माध्यमे वापरूनही अनेक मालमत्ता धारक हे पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे आजही 73 हजार 207 मालमत्ता धारकांकडे 700 कोटींची थकबाकी आहे. महापालिकेने शहरातील 25 हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांनी त्वरित कराचा भरणा करावा अन्यथा 24 जुलैपासून मालमत्ता जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता सात दिवसांचा शेवटचा अल्टीमेटम देवून जप्ती पथके तयार ठेवली आहेत.
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल 20 टक्के सवलत मिळत होती. या सवलत योजनांचा तीन लाखांपेक्षा अधिक मालमत्ता धारकांनी लाभ घेतल्या. त्यामुळेच महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत 447 कोटींचा कर पालिका तिजोरीत जमा झाला.
तरीदेखील शहरातील 31 मार्च 2023 अखेर 25 हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या 73 हजार 207 मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल सातशे कोटी रुपयांचा कर थकीत आहे. हा कर वसूल करण्यासाठी विभागाच्या वतीने एसएमएस, कॉलिंग, रिक्षाव्दारे जनजागृती, होर्डिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तरीदेखील अजून थकबाकी असल्यामुळे जप्तीच्या हालचाली चालू आहेत.