ब्रेकिंग न्यूज!!पिंपरी चिंचवड:राहुल कलाटे यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये वर्णी …शिवसेनेत प्रवेश निश्चित
पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील माजी नगरसेवक व नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेले राहूल कलाटे हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अजित पवार गटाने बंड करुन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचे पडसाद शहराच्या राजकारणावर झालेला पहायला मिळत आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे चिंचवडची जागा आगामी निवडणुकीमध्ये कोणाला मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असताना राहुल कलाटे यांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे आणि त्यामाध्यमातून त्यांना जर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळाली तर हा राहुल कलाटे त्यांचा मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल.
शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत गेल्या महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे आले असता राहुल कलाटे यांनी त्यांची भेट घेतली तेंव्हा पासूनच कलाटे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. काल मध्यरात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर त्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवडमधील काही माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुका व स्थानिक राजकारण कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचे याबद्दल चर्चा झाल्याचे कळते. यावेळी बोलताना राहुल कलाटे म्हणाले की, “जनतेला कनेक्ट होणारा नेता अशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख तयार झालेली आहे आणि त्याचमुळे मी व माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढची दिशा कशी ठरवायची यावर देखील निर्णय झाला असून येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये आपल्याला तो कळेल.
राज्यपाल नियुक्त आमदारपदी वर्णी लागण्याची शक्यता
दरम्यान राहुल कलाटे यांच्या निर्णयानंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडी वरील स्थगिती हटवली आहे, त्यामुळे या माध्यमातून राहुल कलाटे हे आमदार होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
वाकड येथील माजी नगरसेवक राहुल कलाटे हे पूर्वाश्रमीच्या शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महापालिके मध्ये गटनेते होते. चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहुल कलाटे तयारी करत होते, त्यांचा या मतदार संघा मध्ये जनसंपर्क देखील वाढवला होता, शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर कलाटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते.
याच काळात स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने येथून नाना काटे यांना उमेदवारी मिळाली तसेच भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे राहुल कलाटे यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला, उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
या निवडणुकीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर कलाटे ४४ हजार मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिले होते.