पिंपरी चिंचवड:विधिमंडळ अधिवेशनासाठी चार आधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती
आज सोमवारपासून (ता. १७) विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामध्ये शहराशी संबंधित तारांकित प्रश्न, अतांराकित प्रश्न,लक्षवेधी सूचना,स्थगन प्रस्ताव व इतर प्रश्न विधिमंडळ सचिवालयाकडून महापालिकेस प्राप्त होत असतात. त्यासाठी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
विधिमंडळ सचिवांकडे महापालिकेशी संबंधित विषयांची माहिती पाठविण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि शहर अभियंता मकरंद निकम यांची नियुक्ती प्रशासक सिंह यांनी केली आहे. त्यांना सहायक समन्वय अधिकारी म्हणून सहायक आयुक्त सोनम देशमुख आणि उपअभियंता देवेंद्र बोरावके यांची नियुक्ती केली आहे.
इंदलकर व देशमुख यांच्याकडे प्रशासकीय विषयक कामकाज आणि निकम व बोरावके यांच्याकडे अभियांत्रिकी विषयक कामकाजाची जबाबदारी आहे. पावसाळी अधिवेशन कालावधीत सरकारकडून प्राप्त सूचनांचे पालन करून त्यापद्धतीने माहिती विधिमंडळ सचिवांकडे द्यावी, असे सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.