पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस,जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
18 ते 23 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर 19 आणि 20 जुलै रोजी लोणावळा, खंडाळा, माथेरान, ताम्हिणी, मुळशी, कुंडलिका परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.
राज्यात ढगाळ हवामान असून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. सोमवारी (दि. 17) पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यासह रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.