पिंपरी-चिंचवड आता प्रादेशिक परिवहन कार्यालय
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून त्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यात आले आहे. याबाबत राज्याच्या गृह विभागाने आदेश जारी केला असून लवकरच पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रत्यक्ष कारभार सुरु होणार आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर आणि अकलूज या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा समावेश होतो. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढविल्यामुळे पुणे प्रादेशिक कार्यालयाची पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या तीन भागात विभागणी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड आता स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय असणार आहे. जुन्नर, आंबेगाव, पिंपरी-चिंचवड, मावळ असा मोठा परिसर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत येणार आहे. दर्जा वाढल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी वाढल्यामुळे आताच्या मनुष्यबळावर येणारा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. नागरिकांची अनुज्ञप्ती, वाहन फिटिंग प्रमाणपत्र, पासिंग आणि इतर कामे वेळेत होण्यासाठी मदत होणार आहे. नव्या कार्यालयासाठी खालीप्रमाणे एकूण पदे असणार आहेत.
प्रादेशिक परिवहन अधिकारी – 1
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी – 2
सहायक परिवहन अधिकारी – 4
मोटर वाहन निरीक्षक – 30
सहायक मोटर वाहन निरीक्षक – 40
लिपिक – 12
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून त्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यात आले आहे. यासाठी वाढीव मनुष्यबळ मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत एकच कार्यालय असणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे.