पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपद शंकर जगताप यांच्याकडे.. पक्षश्रेष्ठींकडून मोठी जबाबदारी
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सहा महिन्यांपूर्वी भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला होता.आणि आता शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपाचा ‘जगताप पॅटर्न’पुन्हा एकदा नव्याने कार्यरत होणार आहे.
राज्यातील पोटनिवडणूक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये भाजपाची मोठी पिछेहाट सुरू असताना चिंचवडमध्ये केवळ ‘जगताप पॅटर्न’मुळेच पक्षाची पत राहिली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी अचूक नियोजन करीत महाविकास आघाडीचे तगडे आव्हान रोखले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय सोपा झाला. त्यामुळे शंकर जगताप भाजपासाठी ‘संकटमोचक’ ठरले होते. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर सुमारे दोन वर्षे रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. या काळात वैद्यकीय तज्ञांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने जगताप मतदार संघात बाहेर पडू शकले नाही.भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी या काळात त्यांचे लहान बंधू उद्योजक शंकर जगताप यांच्या खांद्यावर चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर शंकर यांनी मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली.दरम्यान दि. ३ जानेवारी २०२३ रोजी लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यावेळी कुटुंबाला सावरण्याची मोठी जबाबदारी शंकर जगताप यांच्यावर पडली होती. त्यांनी कुटुंब आणि पक्ष अशी दुहेरी जबबादारी यशस्वीपणे पेलली आणि पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना विजय मिळला.
पिंपरी-चिंचवड शहरात आपल्या नेतृत्वाची छाप आपल्या कामातून करून देणारे दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा करिष्मा तब्बल २० वर्षे शहरात कायम राहिला आहे. भारतीय जनता पक्षाला शहरात सत्तेचा मार्ग सोपा करून करण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. महापालिकेतील सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात अनेक समर्थकांना त्यांनी महत्त्वाची पदे दिली. मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये जगतापांचा कट्टर समर्थक आहे.राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय काही मान्यवर जगताप यांच्यासाठी अप्रत्यक्ष कामही करीत असतात. केलेली विकासकामे आणि मतांचा अचूक अंदाज याचा जगताप यांना कायम फायदा झाल्यामुळेच ते या मतदार संघाचे अनभिषिक्त सम्राट राहिले आहेत. आता त्यांच्याच तालमीत तयार झालेले शंकर जगताप यांनी माजी नगरसेवक म्हणून पाच वर्षे सभागृहात कामकाज केले आहे. अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू असलेले शंकर जगताप यशस्वी उद्योजक आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या यंत्रणेतील ‘बॅक बोन’ म्हणून त्यांचा दबदबा आहेच शिवाय मतदार संघातील बारीक-सारीक गोष्टींत अप्रत्यक्ष निर्णायक हस्तक्षेप होता. शंकर जगताप यांच्या कामाला हाअनुभव आला आणि निर्णायक मताधिक्य घेण्यात ते यशस्वी झाले. परिणामी, अश्विनी जगताप या ३६ हजारहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. आता भाजपा शहराध्यक्षपदाची संधी मिळाल्यामुळे पुन्हा एकदा शहरात ‘जगताप पॅटर्न’ पहायला मिळणार आहे.