मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. तर शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवले असून आपापल्या भागातील पावसाची परिस्थिती पाहून शाळांना सुट्टी घेण्याबाबत स्वत:च्या अखत्यारित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथील शाळांना सुट्टी असेल.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार उद्या म्हणजे २० जुलै रोजी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्याही पावसाचा जोर कायम राहील. त्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
गरज नसल्यास घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्र्यांचं राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी संध्याकाळी मंत्रालयात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.