February 24, 2024
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

महापालिका शाळांमधील ४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मुल्यांकन -आयुक्त शेखर सिंह यांची माहिती.

महापालिका शाळांमधील ४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मुल्यांकन -आयुक्त शेखर सिंह यांची माहिती.

 

पिंपरी : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे गुणवत्ता मुल्यांकन करण्यासाठी नेमलेल्या भारतीय गुणवत्ता परिषद संस्थेकडून विद्यार्थ्यांचे मुल्यांकन सुरू करण्यात आले असून आतापर्यंत २३ महापालिका शाळांमधील ४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण तसेच मुल्यांकन करण्यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, पर्यावरण अभ्यास या विषयांचा तसेच उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातंर्गत महापालिकेच्या ११० प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी महापालिका विविध उपक्रमांचे आयोजन करत असते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, विद्यार्थी आणि शिक्षकांचे मूल्यमापन महापालिकेच्या शाळांच्या शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात आहे. मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्याचा कल ओळखून त्यावर प्रभावीपणे काम करणे हा या मागचा हेतू आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला आणि शेवटी केल्या जाणाऱ्या मुल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये भर पडत असून भारतीय गुणवत्ता परिषदेच्या सहाय्याने निःसंशयपणे महापालिकेला प्रभावी शैक्षणिक धोरण आखण्यास मदत मिळेल.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, महापालिका शाळांच्या मुल्यांकनाद्वारे आलेल्या निकालांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेत सुधारणा करण्यासाठी योग्य कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले असून या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा कल ओळखण्यास आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यास शिक्षण विभागाला मदत होणार आहे.सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांचे मुल्यांकन झाल्यानंतर सविस्तर अहवाल त्यांच्या पालकांना पाठविण्यात येणार आहे. याद्वारे पालकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी समजून घेता येईल तसेच शिक्षकांना विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करता येईल.  शिक्षक आणि विद्यार्थीनिहाय अहवाल तयार केला जाणार या उपक्रमामध्ये अध्यापन,अध्ययन प्रक्रियेचाही समावेश आहे. यामध्ये तज्ञांकडून १ हजार ३०० पेक्षा जास्त शिक्षकांचे मुल्यमापन करण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी कृती आराखडा विकसित करून त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे तज्ञ धोरणात्मक सहाय्य प्रदान करतील, ज्यामुळे अध्यापनाच्या परिणामकारकतेचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. यासाठी एक विस्तृत आयटी प्लॅटफॉर्म तसेच डॅशबोर्ड तयार करण्यात येणार असून याद्वारे शिक्षकनिहाय आणि विद्यार्थीनिहाय अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालाच्या दृष्टीने ३ वर्षांसाठी विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचा आरोग्य अहवाल तयार करणार

विद्यार्थ्यांच्या आरोग्य संबंधित समस्या ओळखून त्या दूर करण्यासाठी महापालिका प्रत्येक विद्यार्थ्याचा आरोग्य अहवाल तयार करणार आहे. या अहवालाचा आढावा विस्तृत आयटी प्लॅटफॉर्मद्वारे घेण्यात येणार असून हा अहवाल संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना पाठविण्यात येणार आहे.

Related posts

आंदर मावळची सुकन्या झाली पहिली महिला पोलिस अधिकारी-श्रुती मालपोटेचे उज्वल यश

pcnews24

संस्था चालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण विषयावर गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन

pcnews24

राज्य सेवा परीक्षेत प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

pcnews24

सरकारी शाळा ‘कार्पोरेट’ला दत्तक नको- सामान्य नागरिकाचे निवेदन,गरीब,बहुजन समाजातील मुले मोफत हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती ?

pcnews24

पिंपरी:राज्यपाल रमेश बैस पदवीदान समारंभासाठी पिंपरीत येणार.

pcnews24

पिंपरी:अबॅकस स्पर्धेत पॉझिटीव्ही प्रोऍक्टिव्ह विद्यार्थ्यांना भरघोस यश

pcnews24

Leave a Comment