मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लांबच लांब रांगा;सलग सुट्ट्यांमुळे वाहतूककोंडी.
स्वातंत्र्य दिनाला लागून असलेल्या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दोन दिवस वाहतूककोंडी झाली आहे. पर्यटन स्थळं आणि मंदिरांमध्ये गर्दी होत आहे.अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बोरघाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन ते तीन कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या.
शनिवार, रविवार सलग सुट्ट्या आल्याने आणि एक दिवस सोडून स्वातंत्र्य दिन असल्याने पर्यटक खास सुट्ट्या काढून लोणावळा आणि खंडाळा येथे फिरण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
लोणावळा परिसरात भूशी धरण, भाजे लेणी, एकवीरा देवी,पवना धरण, राजमाची असे अनेक पर्यटन स्थळं फिरण्यासारखी आहेत. येथे फिरायला येणाऱ्यांमध्ये तरुण – तरुणींची संख्या जास्त असते. तरुण-तरुणी या परिसराला पसंती देतात. त्यामुळे पावसाळ्यात ही ठिकाणं हाऊस फुल्ल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शनिवारी महामार्गावर १२ किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. आज रविवारी देखील सकाळपासून पुन्हा वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. लांबून येणाऱ्या पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तरी देखील पर्यटकाचे प्रमाण कमी होत नाही.
बोरघाटात पावसाची रिमझिम सुरू आहे. गेल्या महिन्यात एक्स्प्रेस-वे वर दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे दरड हटवण्यासाठी एक्स्प्रेस-वे वर काही तासांचा बंदही घेण्यात आला होता. या आठवड्यात सलग सुट्ट्या आल्याने अनेक मुंबईकर नागरिक पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळ्याला पसंती देत आहेत. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.