कर्नाटक, बागलकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनानं हटवल्यामुळे तणाव.
कर्नाटकातील बागलकोट येथे परवानगी न घेता उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात नगरपरिषदेकडून जेसीबी लावून कडक बंदोबस्तात हटवण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमधून कर्नाटक सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप व हिंदुत्ववादी संघटनांकडून या कारवाईला विरोध होत आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः मंदिर, मस्जिद आणि काँग्रेस कार्यालय येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर या कारवाई विरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बैठक देखील बोलावली आहे,या बैठकीचे नेतृत्व करणारे बागलकोटचे माजी आमदार विरणा चरनीमठ आणि कार्यकर्त्यांनी बागलकोट बंदची हाक देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात काल मध्यरात्री बारा वाजल्यापासून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जमावबंदीचे आदेश असताना देखील भाजपाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने एकत्र येथे सहभाग घेतला. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बागलकोट गदग विजापूर या भागात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजांनवर बंदी घालण्याचा आदेश दिलेला असताना देखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही असाही प्रश्न यावेळी हिंदुत्ववादी संघटनांकडून विचारण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे पुन्हा उभा करू असे तेथील माजी आमदारांनी म्हटले आहे.
दरम्यान, बागलकोटच्या घटनेचे महाराष्ट्रात देखील पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, “कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं मुजोरी करत बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे.”