शिवरायांची वाघनखं मायभूमीत परतणार
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं लवकरच मायभूमीत परतणार असून तशी इंग्लंडने तयारी दर्शवली आहे.
अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात परतण्याची शक्यता आहे. ब्रिटनने ही वाघनखं परत करण्यास तयारी दर्शवली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा कधी सांगितला जातो, तेव्हा अफजलखानाचा वध या घटनेचा आणि कोथळा बाहेर काढल्याचा उल्लेख केलेला साहजिकपणे होतो. महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध करण्यासाठी जी वाघनखं वापरली होती, ती सध्या ब्रिटनमध्ये आहेत.
या वाघनखां बरोबरच महाराजांची जगदंबा तलवारही ब्रिटनमध्येच आहे. मागील अनेक काळापासून राज्य सरकार ही तलवार आणि वाघनखं मायभूमीत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसत आहे. कारण ब्रिटनने वाघनखं परत करण्यास तयारी दर्शवली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे.
ब्रिटनने वाघनखं आपल्याला परत करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात आपण इंग्लंडला जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ही वाघनखं सध्या अल्बर्ट म्युझिअममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. सुधार मुनगंटीवार यावेळी विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझिअमसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत.