मोदींच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताची वेगाने प्रगती;डॉ. मनमोहन सिंग.
माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदींचे कौतुक केले आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली आहेत.ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत असून, रशिया – युक्रेन युद्धाबाबत मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक त्यांनी केले आहे
मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या सार्वभौम आणि आर्थिक हितांना प्राधान्य देऊन शांततेचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे हे उत्तम उदाहरण आहे. देशाची वाटचाल योग्य मार्गाने सुरू असल्याचे हे प्रतीक ठरले आहे, असे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे.
जी-२० परिषदेचे यजमानपद भूषविण्याची संधी भारताला मिळाली, ही महत्त्वपूर्ण घटना आहे. मुख्य म्हणजे या सगळ्या घटनाक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली, हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. या परिषदेत सामील झालेल्या देशांमध्ये विविध विषयांवर मतैक्य घडवून आणण्या कामी भारत मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.