चिंचवड:महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने ग्राहकाच्या घरी सोलर सिस्टिम बसवल्याबाबत तपासणी अहवाल देण्यासाठी सोलर सिस्टिमच्या ठेकेदाराकडे दहा हजारांची लाच मागितली. याची पडताळणी करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कार्यकारी अभियंता राजेंद्रकुमार साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने एसीबी कडे तक्रार केली आहे.
तक्रारदार हे सोलर सिस्टिमचे ठेकेदार आहेत. सोलर सिस्टिम बसविण्याबाबत ग्राहक व एमएसईडीएल यांच्यामध्ये ते लायझनिंगचे काम करतात.त्यांनी एका ग्राहकाच्या घरी सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशनचे काम केले होते. त्या कामाची एनओसी / तपासणी अहवाल मिळण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. त्याचा पाठपुरावा तक्रारदार स्वत: करीत होते. लोकसेवक राजेंद्रकुमार साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडे एनओसी व मीटर टेस्टींगसाठी १० हजार रुपये लाच मागितली.
याबाबत एसीबीच्या कार्यालयात दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने २३ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यामधे कार्यकारी अभियंत्याने या कामासाठी स्वतःसाठी तसेच कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास एसीबीकडून केला जात आहे.