युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी पिंपरीच्या गौरव चौधरीची आणि गोवा राज्याच्या प्रभारीपदी निवड.
पिंपरी- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदावर कार्यरत असलेल्या गौरव चौधरी याची भारतीय युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी आणि गोवा राज्याच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांनी नुकतेच चौधरी यांना पत्र देऊन सन्मानित केले.पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिभावंत,अभ्यासू अशी गौरव चौधरी यांची ओळख आहे.
भारतीय युवा काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ हा उपक्रम जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येतो. या उपक्रमातून उत्कृष्ट सादरीकरण आणि वकृत्व सिद्ध करणाऱ्यांची प्रवक्ता आणि इतर पदांवर निवड केली जाते.
सखोल अभ्यास, उत्कृष्ट वकृत्व यामध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. यामुळे जिल्हा व राज्य स्तरावर गौरव चौधरीने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच बेंगलोर येथे झालेल्या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अतिशय प्रभावीपणे आपले मुद्दे मांडून भाषण केले. याची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी गौरव चौधरी याची भारतीय युवक काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्ट (राष्ट्रीय प्रवक्ता) पदी निवड केली. तसेच ‘यंग इंडिया के बोल सीजन ४’ साठी गोवा राज्याच्या प्रभारी पदी निवड जाहीर केली आहे.
यापूर्वी गौरव चौधरी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसमध्ये शहर सरचिटणीस आणि युवा प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे. राज्यस्तरावर पोलिसांची संघटना, डोंबारी समाजाचे पुनर्वसन, फार्मासिस्ट यांचे प्रश्न अशा प्रश्नांवर संघटन उभारून काम करीत आहे. त्याच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.