सरपंच आमचाच!ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून मावळमध्ये रंगले दावे-प्रतिदावे- राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या गटातच जुंपली!
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रविवारी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर झाला. विशेष म्हणजे ही निवडणूक चिन्हावर होत नसूनही सर्वाधिक ग्रामपंचायती आपणच जिंकल्याचा दावा राजकीय पक्षांकडून केला जात आहे. मावळ तालुकाही(जि.पुणे) त्याला अपवाद नाही. येथील १९ पैकी १० ग्रामपंचायतींचे सरपंच आपले झाल्याचा दावा भाजपने केला , तर ऐंशी टक्के सरपंच आपलेच निवडून आल्याचा प्रतिदावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.
मावळातील १९ ग्रामंचायतींची रविवारी निवडणूक झाली. त्यातील चार बिनविरोध झाल्या. त्यातील एकेक सरपंच आपला निवडून आल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादीने अगोदरच केला होता. त्यामुळे रविवारी १५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यात नऊ सरपंच आपले झाल्याचा दावा भाजपचे माजी मंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे आणि भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केला आहे.
तर, राष्ट्रवादी (अजित पवार)गटाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी ऐंशी टक्के सरपंच आपले झाल्याचा प्रतिदावा केला.
रवींद्र भेगडे यांनी आपले सरपंच झालेल्या गावांची व तेथील सरपंचांच्या नावांची यादी दिली. तशी राष्ट्रवादीकडूनही देण्यात आली. भाजपने आपल्या नवनिर्वाचित सरपंचांचा तात्काळ सत्कारही केला.
मावळ तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही निवडणूक ठरली आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर बाळा भेगडेंनी दिली, तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाचा हा विजय असल्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष खांडगे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला निधी आणि गावपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या कष्टाचे हे फळ असून, हा विजय गावाच्या विकासासाठी समर्पित केला असल्याचे त्यांनी सांगितले.